निसर्ग निरीक्षण परिसर अभ्यास हा विषय नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेच. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही जीवशास्त्र शिकताना या शिबिराचा फायदा होऊ शकतो. या शिबिरातून तयार होणारे शैक्षणिक तक्ते व इतर साधने गावातल्या शाळेतच रहातात.
वेध घेऊ विश्वाचा-सप्ताह खगोलशास्त्राचा या शिबिरात सूर्यमाला, विश्वाची निर्मिती, तारे, अवकाशस्थ इतर वस्तू, प्रकाशाचा वेग या विषयांची विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. लघुतारांगण, दुर्बिण, स्लाइड्स या माध्यमातून शिकवले जाते.
नाट्यशिबिरात केंद्राच्या गावातील उत्साही विद्यार्थ्यांना, इतर तरुणांना नाट्य अभिनय, दिग्दर्शन, नवे प्रयोग, संवाद, शब्दफेक या विषयांवर मार्गदर्शन लाभू शकेल. शिबिराच्या अखेरीस त्यांच्याकडून छोटे नाट्य प्रयोग, नाट्य छटा करवून घेण्यात येतात.
स्त्रियांसाठी असलेल्या शिबिरात ग्रामीण स्त्रियांच्या उपयोगी येतील अशी काही शास्त्रोक्त सोपी तंत्रे शिकवणे, त्यांना आपल्या व आपल्या कुटुबियांच्या सर्वांगीण स्वास्थ्याच्या दॄष्टीने जागॄत करणे ही उद्दिष्टे साध्य होतात. परसबाग प्रशिक्षण हे मुख्यत्वे स्त्रियांसाठी म्हणून आखले असले तरीही रुची असल्यास पुरुष मंडळींसही खुले असेल. या शिबिरात कॄषी, फलोद्यान विकास, भाजीपाला लागवड या विषयांतील जाणकार तज्ञ येतील. छोटयाशा परसबागेत कमीत कमी खर्चात उपलब्ध साधनांचा वापर करुन जास्तीत जास्त फुले, मसाले, भाज्या कशा मिळविता येतील या दॄष्टीने शिस्तबध्द आखणीचे प्रशिक्षण ग्रामीण भागात सर्वांना उपयोगी ठरणार आहे.
१९९२ पासून अशा प्रकाराची अनेक शिबिरे विभागातर्फे घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील केळ्वे, पालघर, बोर्डी, मुरबे, भिवंडी, विरार; रायगड जिल्ह्यातील कापडे, विघवली, देवळे, करुळ, गोरेगाव, श्रीवर्धन; रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, पोफळी, गुहागर, चिपळूण, अलोरे, मंडणगड, ओणी, मुर, भरणे; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडळ, खारेपाटण, आचरे, आजगाव, पणदूर, मोगरणे, काळसे या गावांमध्ये या शिबिरापैकी प्रत्येकी दोन ते तीन शिबिरे झाली आहेत. हे शिबिरांचे कार्यक्रम ज्या गावांत होतात त्याच्या शेजारच्या लहान गावांनाही या कार्यक्रमांचा थोडा फार प्रमाणात लाभ दिला जातो.
या शिबिरांमुळे विशेषतः शालेय विद्यार्थ्याना फारच फायदा होतो. शिकवण्याची वेगळीच पध्दत, निरीक्षण व प्रत्यक्ष कॄतीवर भर असल्यामुळे सुट्टीतल्या आनंददायक शिबिराचा अनुभव त्यांना मिळतो.
या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी आपल्या गावात बहि:शाल शिक्षण केंद्र सुरु करणे आवश्यक आहे.
गावातील शाळा, महिला मंडळ किंवा सर्वांना जवळची वाटेल अशी एखादी संस्था हे केंद्र सुरु करु शकते.
नवीन बहि:शाल शिक्षण केंद्र वर्षभरात केव्हाही स्थापन करता येते.
बहि:शाल शिक्षण केंद्राने शाळा, वाचनालय, इतर सांस्कॄतिक कार्य करणार्या संस्था व संघटना यांना घेऊन सोबत काम करायचे आहे.
शिबिरे ठरवताना वर्षाच्या सुरुवातीपासून ठरवायला हवीत. ही शिबिरे शक्यतो उन्हाळी व हिवाळी सुट्ट्यांच्या कालखंडात आयोजित करावीत. शिबिरांच्या आयोजना संदर्भात विभागाशी, संचालकाशीही थेट बोलावे.
कार्यक्रमाच्या आयोजनाची म्हणजे संपर्कावरील खर्च, बैठकव्यवस्था, ध्वनीव्यवस्था, व्याख्यात्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था ही जबाबदारी केंद्राची आहे. व्याख्यात्यांचा प्रवास, मानधन इत्यादि खर्च विद्यापीठ देईल. या खर्चाच्या मागणीपत्रावर केंद्राधक्षांची सही असणे आवश्यक असते. |